मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरील आठ बाय आठच्या खोलीत बसून महाराष्ट्राचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. 'सामना' दिलेल्या मुलाखतीत ते एकाच जागी बसून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या कारभार चालवण्याच्या निर्णयाचे समर्थन करतात. यामुळे ते किती अज्ञानी आहेत, हे जनतेसमोर आल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ते मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर आगपाखड केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा सॅलिअनची बलात्कारानंतर हत्या; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

यावेळी नारायण राणे यांनी म्हटले की, सध्या राज्यात सरकार अस्तित्त्वात आहे, असे वाटतच नाही. मंत्रालयात केवळ अधिकारी बसून असतात. इतर कोणी मंत्रालयात जात नसेल तर ते कायमचं बंद करुन टाका. तसेही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि पूर्ण पगार मिळत नाही. राज्यातील कोरोना मृतांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. एकूणच काम न करणे, हेच सरकारचे धोरण असल्याची आगपाखड यावेळी नारायण राणे यांनी केली. 

याउलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर न पडता प्रशासन चालवायची प्रतिज्ञा केली आहे, अशी टीकाही राणे यांनी केली. याशिवाय, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांवरूनही राणेंनी सरकारला लक्ष्य केले. निसर्ग चक्रीवादळानंतर राज्य सरकारने कोकणाला एका रुपयाची मदत केली नाही. यानंतर आता कोकणचे आराध्यदैवत असलेल्या गणपतीसाठीही लोकांना जाऊन दिले जात नाही. सरकारने लादलेल्या अटी योग्य नाहीत. राज्य सरकारने कोकणात येणाऱ्या लोकांसाठी केवळ एक दिवसाचा क्वारंटाईन कालवाधी ठेवावा. तसेच खासगी वाहनांनी जाणाऱ्यांना ई-पासची सक्ती करु नये, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.