शिवसेनेचा दबाव, भाजपने फायनल किरीट सोमय्यांचा पत्ता कापला
खासदार किरीट सोमय्या यांचे भाजपने तिकीट कापले आहे.
मुंबई : शिवसेनेची कोणतीही नाराजी नको, म्हणून भाजपने पूर्ण काळजी घेतलेली दिसत आहे. सातत्याने शिवसेनेवर टीका करणारे आणि थेट 'मातोश्री' ला टार्गेट करणारे खासदार किरीट सोमय्या यांचे भाजपने तिकीट कापले आहे. उत्तर पूर्व मुंबईतून भाजपकडून लोकसभेसाठी सोमय्या यांच्या ऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे ते उमेदवार असतील. भाजपने आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली. या यादीत उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या यादीत उत्तर प्रदेशातील पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे.
मनोज कोटक यांची ईशान्य मुंबईत चांगली कामगिरी आहे. याचा विचार करुन त्यांना ही संधी देण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोटक यांच्या कामकाजावर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. मात्र यामुळे या मतदार संघातील सध्याचे खासदार किरीट सोमय्यांचा पत्ता कापला गेला आहे. किरीट सोमय्या यांचा पत्ता कापण्यासाठी शिवसेनेने मोठे भाजपवर दबावतंत्र वापरले होते. त्यात शिवसेनेला यात यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोण आहेत कोटक?
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाचा तिढा अखेर सुटला आहे. विद्यामान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचा सोमय्यांच्या नावाला जोरदार विरोध होता. त्यामुळे शिवसेना दुखावू नये म्हणून सोमय्या यांना डावले गेले आहे. मनोज कोटक हे २००७ पासून महापालिकेत नगरसेवक आहेत. २००७, २०१२ आणि २०१७ असे तीन वेळा मुलुंडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मुंबई महापालिका भाजपचे गटनेता म्हणून साडेचार वर्ष काम करत आहेत. तर पालिका शिक्षण समिती अध्यक्षपदही संभाळले आहे.