मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aghadi Government) सहा महिन्यात पडणार असे विरोधक सांगत होते. आज एक वर्ष होत आहे, मी सांगतो पुढील चारही वर्षे हे सरकार चांगले काम करत राहणार. विरोधक त्यांचे काम करत आहेत. ते थयथयाट घालत आहेत. मात्र, सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झालेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! ईडी (ED), सीबीआयची (CBI) भीती कुणाला दाखवता, असा प्रति सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी विचारला आहे.


'वाढीव वीजबिल : मंत्रिमंडळाने हा विषय सोडलेला नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister  Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या ( Mahavikas Aghadi Government) वर्षपूर्तीदिनी दैनिक ‘सामना’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधक सरकारवर करीत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळे आहेत हे विसरू नका; पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवल्याचा इशाराही त्यांनी दिला. 


मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्पृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्पृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, अशा स्पष्ट शब्दात विरोधकांना इशारा दिला.


तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असे मुख्यमंत्री म्हणाले.


'सरकारचे चांगले काम चालले आहे'


सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून सहकार्याची भूमिका घेतली. त्यांच्याही मनात एक असे होते की, चला आता वातावरण मोकळे झाले, चांगले झाले. आता कामाला लागूया! हे जे काही सहकार्य करताहेत ते महत्त्वाचे आहे. संपूर्ण राज्यातली प्रशासनाची यंत्रणा आहे, पोलीस आहेत, महसूल विभाग आहे. सगळ्यांचेच सहकार्य लाभत म्हणून आणि म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं आणि मला आत्मविश्वास आहे की पुढचीसुद्धा चार वर्षे नक्कीच आम्ही पार करूच करू. पुढच्या पाच वर्षांचं जनता आहेच. ती ठरवेल, असे ते म्हणाले.


मी सुरुवात केली तीच मुळी मायबाप जनतेला साष्टांग दंडवत घालून. कारण त्यांचा भरभक्कम आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास याशिवाय हे सारं अशक्य होतं. अशा राजकीय घडामोडी घडत असतात किंबहुना घडतात, पण त्या प्रत्येक घडामोडीच्या मागे जनता असतेच असं नाही. तुम्हाला गेल्या वर्षाचा तो दिवस आठवत असेल शपथविधीचा. तेव्हा शिवतीर्थ फुलून गेलं होतं. आनंदाने ओसंडून वाहत होतं. काही जणांना असं वाटलं की हे जनमताच्या विरुद्ध झाले. आपणही त्याचे साक्षीदार आहात. एक महत्त्वाचे घटक आहात. आघाडी करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत होते तेव्हा मुळातच काहीजणांना वाटत होतं की, हे तिन्ही पक्ष एकत्र येणारच नाहीत. काही जणांचा तसा कयास होता. त्यांना वाटत होतं शिवसेना आपल्या मागे फरफटतच येईल. शिवसेनेला आपल्याच मागे यावं लागेल. त्याशिवाय ती काहीच करू शकत नाही असा ज्यांचा समज होता तो आपण फोल ठरवला. यात नक्कीच काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची. मग त्यात सोनिया गांधी यांचीही आहे. राष्ट्रवादीची भूमिकाही महत्त्वाची. मग शरद पवारजी आहेत. त्यांनीसुद्धा नाही म्हटलं तरी एक राजकीय धाडस दाखवलं आणि विश्वास दाखवला.