Crime News : मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज रॅकेट उध्वस्त केली जात आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मालवणी येथून 50 लाख रुपयांच्या हेरॉईनसह (heroin) एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. हे ड्रग्ज राजस्थानातून आणण्यात आले होते. मुंबईत नववर्षानिमित्त होणाऱ्या पार्टीमध्ये विकण्यासाठी हे ड्रग्ज आणले होते अशी माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल अहमद शेख याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.


कशी केली अटक?


मालवणी पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश साळुंखे यांना मालवणीतल्या रफिक मैदानाजवळ एक व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. साळुंखे यांनी ही माहिती वरिष्ठांना देऊन मैदानाजवळ एक पथक तैनात केले. त्यानंतर आरोपी बॅग घेऊन तेथून जात होता. पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 126 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 50 लाखांच्या वर आहे.


आरोपी खासगी कंपनीत बाऊंन्सर


पोलिसांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी त्याने आपलं नाव सोहेल अहमद शेख असल्याचे सांगितले. त्याने आपण बाउंन्सर असल्याचे सांगत एका खासगी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. आपण मोठे उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्या संरक्षणाचे काम करत असल्याचे त्याने सांगितले.  काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले.


त्यानंतर त्याचा एक मित्र आणि तो राजस्थानला गेला आणि तिथे त्याला एका ड्रग्ज पेडलर भेटला. शेखने नंतर त्याच्या ओळखीबद्दल माहिती दिली. तसेच पार्ट्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या ड्रग्सबद्दलही सांगितले. यानंतर शेखने पार्ट्यांमध्ये विक्री करण्यासाठी ड्रग्जची मागणी केली. पेडलरने शेखवर विश्वास ठेवत त्याला एक पैसाही न घेता ड्रग्ज दिले. मात्र मुंबईत येताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेख हा विविध पार्ट्यांसाठी ड्रग्जची ऑर्डर घेत होता. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.