शिवसेनेचा 13वा खासदार शिंदे गटात जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: शिवसेना खासदाराची घेतली भेट
मुंबई : शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत वेगळा गट स्थापन केला आहे. आता शिवसेनेचा तेरावा खासदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याला कारण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: शिवसेना खासदाराची घेतलेली भेट.
मुख्यमंत्री किर्तिकरांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची त्यांच्या गोरेगाव इथल्या निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन राजकिय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
गजानन किर्तिकरांवर शस्त्रक्रिया
गेल्या आठवड्यात कीर्तिकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याने रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. यानंतर तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी कीर्तिकर याना दिलेला होता. ही शस्त्रक्रिया होऊन नुकतेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात आल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्यावर त्यांनी स्वतः आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.