मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची उद्या बैठक बोलवली आहे. मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. संसद अधिवेशनातील व्यूहरचना, सिटीजनशीप अमेंडन्मेंट बिल आणि राज्यातील मुद्दे यावर  चर्चा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती होऊन शिवसेनेला फटका बसला. त्यानंतर राज्यात निम्मा निम्मा वाटा यावरुन निवडणुकीनंतर युती तुटली. भाजपने शिवसेनेची मागणी धुडकावून लावल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली. तसेच केंद्रातील मोदी सरकारमधून शिवसेना बाहेर पडली. एडीएचा एक घटक पक्ष सत्तेतून बाहेर पडला. त्यानंतर शिवसेनेने नवीन मित्र सोबत घेत राज्यात सत्ता स्थापन केली.



लोकसभेत शिवसेनेचा आवाज अधिक उठून दिसावा यासाठी रणनिती अवलंबिली जाण्याची शक्यता आहे. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना कशी भूमिका घेणार याचीही उत्सुकता आहे. याबाबत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात, याचीही उत्सुकता  आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने जे घाईघाईत निर्णय घेतले आणि भाजपच्या नेत्यांसाठी जे पोषक निर्णय होते, ते ठाकरे सरकारने रद्द केले आहेत. तर काही स्थगित केले आहेत. त्यामुळे भाजपला चाप देण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे 


गेल्या जवळपास महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तेचा पेच सुटला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, तरी अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. सरकार स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर कोणाला कोणते खाते यावर महाविकासआघाडीत एकमत झालेले नाही. त्यातच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी चर्चा आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या मागणीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले आहे. लवकरच राज्य मंत्रिंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी शिवसेनेकडून ही मागणी झाल्याने याची चर्चा सुरु झाली आहे. गृह खात्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, आजपर्यंत मुख्यमंत्र्यांकडेच हे खाते राहिले आहे.