मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विधीवत गुढीपूजन केले. यावेळी त्यांची पत्नी अमृता, मुलगी दिवीजा देखील उपस्थित होते. संपूर्ण जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे. येत्या वर्षभरात राज्यातली टंचाईसदृश स्थिती दूर होऊ दे अशी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवं वर्ष हे सर्वांसाठी सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं आणि विशेषत: पुन्हा एकदा या देशाला मोदींच्या माध्यमातून एक नवीन मजबूत सरकार मिळो ही देखील यादिवशी शुभेच्छा आहे. येणारं वर्ष महाराष्ट्रासाठी सुखा-समाधानाचं जावं. महाराष्ट्रात ज्या भागात दुष्काळ आहे त्या दुष्काळी भागातील लोकांना नवीन वर्षाच्यानिमित्ताने दिलासा मिळावा अशाप्रकारचा पाऊस व्हावा हीद्खील प्रार्थना असलल्याचे मुख्यमंत्रांनी सांगितले. 


उदयनराजे भोसले यांनीही पारंपरिक पद्धतीने केले गुढीपूजन 


आज गुढीपाडवाचा सण मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे भोसले यांनी देखील हा गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. घरातील देवांचे दर्शन घेऊन उदयनराजे यांनी त्यांचा आई कल्पनाराजे भोसले यांच्या पाया पडून गुढीचे विधिवत पूजन केले. यानंतर बोलताना त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत हे वर्ष सगळ्यांना भरभराटीचे जावे अशी सदिच्छा व्यक्त केली.


आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. मराठी नवीन वर्षांचा पहिला दिवस. यालाच गुढीपाडवा आणि वर्षप्रतिपदा असही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे. यादिवशी नविन संवत्सराचा प्रारंभ होतो याठिकाणी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात आणि गुढी उभारल्या जातात. प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवास संपवून लंकेचा अधिपती रावणाचा वध करुन विजयी होउन जेव्हा अयोध्येत परतले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. अयोध्या नगरी श्रीरामाच्या या विजयाने आनंदून गेली होती. त्याचाच भाग म्हणून घरोघरी गुढी उभारल्या जातात अशा अनेक अख्यायिका आहेत. यादिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात श्रीखंड पुरी,शेवयांची खीर असा बेत आखला जातो. गुढी पाडव्यानिमित्त आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभर स्वागत यात्रा काढल्या जातात.