मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटीबाबत नारायण राणे यांच्याकडून दुजोरा दिला गेला आहे. मात्र या भेटीतल्या चर्चेचा तपशील सांगायला मात्र नारायण राणेंनी नकार दिला. लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं, राणे म्हणाले. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये विधानपरिषद पोटनिवडणूक आणि मंत्रीमंडळात समावेशाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
 
दरम्यान, नारायण राणे यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना रात्री अहमदाबादमध्ये भेटले. मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या या भेटीत गुजरात निवडणूक निमित्तानं महाराष्ट्रातले मंत्री-नेते-पदाधिकारी यांच्या सभा- दौरे तसंच जबाबदारी यावर चर्चा करुन वेळापत्रक निश्चित केलं गेलं. गुजरात निवडणूक प्रचारात भाजप महाराष्ट्रातली रसद घेऊन पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 


मात्र या भेटीत राज्य मंत्रीमंडळ विस्तार, राणे यांना मंत्रिपद, अशा कोणत्याही गोष्टीवर चर्चा झाली नसल्याचा दावा भाजपनं केलाय. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पुढच्या आठवड्यात २८ तारखेला याबाबत बैठक होण्याची शक्यताही भाजपनं वर्तवलीय.