दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील मालाड इथं संरक्षक भिंत कोसळून 18 जण ठार, तर 75 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची उच्चरस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना केली. दोन दिवसांच्या पावसात तुंबलेल्या मुंबईवर विरोधकांनी आज विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.मालाडच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे पाच लाख आणि महापालिकेतर्फे पाच लाख रुपये मदत दिली जाईल, तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकारतर्फे केला जाईल. तसंच या दुर्घटनेतील सर्वांचे पुनर्वसन केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत काल रात्री पडलेला पाऊस अभूतपूर्व होता. 4 ते 5 तासाच्या काळात 375 ते 400 मिलिमीटर पाऊस पडला. एवढ्या कमी वेळेत एवढा पाऊस याआधी 974 साली पडला होता. त्यानंतर सगळ्यात जास्त पडलेला पाऊस 2005 सालचा होता. 40 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा कमी वेळात पडलेला जास्त पाऊस आहे. मुंबईची जून महिन्याची पावसाची सरासरी या तीन दिवसात भरून निघाली, असे सांगत पालिका प्रशासनाचा कोणताही दोष नसल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं.



मुंबईत 24 तासात 150 मिमी पाऊस पडतो, त्यावेळी मुंबईची व्यवस्था पावसाचे पाणी बाहेर काढण्याचे काम करू शकते. मात्र कमी वेळात जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा त्यावर जास्त ताण पडत असतो. त्यामुळेच कालची घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मालाडमध्ये संरक्षक भिंत होती, ती पाण्यामुळे तुटली आणि पाणी खालच्या भागात गेल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज सगाळी रुग्णालयात जाऊन मालाड दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षात जाऊन मुंबईच्या स्थितीचा आढावा घेतला. 


पाऊस आणि समुद्राला भरती असते तेव्हा आतलं पाणी बाहेर जाऊ शकत नाही आणि पाण्याची पातळी वाढते. पाऊस जोरात असेल तर प्रचंड प्रमाणात पाणी साठते. त्यामुळे सात पंपिंग स्टेशन तयार करून हे पाणी बाहेर फेकायची योजना होती. यातील पाच पंपिंग स्टेशन तयार झाले आहेत. मात्र दोन पंपिंग स्टेशन परवानगीच्या कचाट्यात अडकले होते. माहुलच्या आणि आणखी एका जागेवर पंपिंग स्टेशन उभे राहिल्याशिवाय पाणी तुंबण्याचा प्रश्न संपणार नाही. 


मिठागराची जागा आपण सक्तीने संपादीत केली आणि केंद्राला कळवले आहे. आता दोन्ही जागा महापालिकेच्या अखत्यारित आल्या आहेत. लवकरच पंपिंग स्टेशनचे काम सुरू होईल. यामुळे मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितले.


मिठी नदी, इतर नाले, नद्या या मोकळ्या करण्याची आवश्यकता आहे. मिठी नदीवरील अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर दूर केली आहेत. अजूनही काही भागात अतिक्रमणं आहे. ती काढायचे काम सुरू आहे. यावर्षी महापालिकेने मुंबईतील नाल्यांवरील बांधकामे काढण्याचे काम हाती घेतलं होतं. अनेक ठिकाणी याला विरोध झाला. याबाबत कडक निर्णय घ्यावे लागतील. नदी, नाल्यांवरील अतिक्रमणं काढण्याबाबत कडक निर्णय घ्यावे लागतील, असे सांगताना जिथे टेकड्या, दरडी कोसळू शकतात त्यांचे स्थलांतर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


नालेसफाईबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, नालेसफाईचे धोरण ठरवावे, कधी टेंडर काढावे, कधीपर्यंत काम पूर्ण करावे हे महापालिकेने स्पष्ट करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


पुण्यातील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनाही मदत केली जाईल. तसंच कोढव्यातील दुर्घटनेनंतर पुण्यातील 267 ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यातील 6 ठिकाणीचे कॅम्प काढण्यात आले आहेत. पुण्यातील आजची दुर्घटना भिंतीवर झाडं पडल्याने घडलीय. तरीही या घटनेचीही चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.