मुंबई : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. पण सरकार म्हणून आम्ही या  शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे. तसंच या भागातून लोकांचं स्थलांतर व्यवस्थित व्हावं असंही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावं तसंच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असं सांगितलं. 


नुकसानीचे पंचनामे सुरू करा


सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व  महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झालं आहे, शेतपिक वाहून गेलं आहे, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका 


निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.  यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसंच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.


हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले


एनडीआरएफ जवानांनी तसंच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर , औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उस्मानाबादमधून 16 जणांना हेलिकॉप्टरने तर 20 जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये 3 जणांना हेलिकॉप्टरमधून तर 47 जणांना बोटीतून वाचविलं. 


एनडीआरएफ बचाव कार्यात


एनडीआरएफचं 1 पथक उस्मानाबाद आणि 1 पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.


मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा घेतला आढावा 


उस्मानाबाद  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके प्रभावित झाले असून एकूण दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याने शिराढोण 171 मिमी, गोविंदपुर 107 मिमी, ढोकी जाकची आणि तेर येथे जवळपास 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये दोन मोठ्या नद्या असून मांजरा नदीवरील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून साधारणतः 706 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 


धरणाच्या खालील वाकी व वाक्केवाडी गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि गावातील नागरिक अडकले होते. या नागरिकांना स्थानिक बचाव पथकांच्या माध्यमातून बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपुर गावातील सहा व्यक्ती तेरणा नदीच्या पाण्यामुळे वेढले गेल्याने ते उंच भागात टेकडीवर आसरा घेऊन थांबले आहेत. यांच्या बचावासाठी भारतीय हवाई हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरपरिस्थितीदरम्यान मदत व बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम तैनात करण्यात आली आहे.