मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोकणात जाण्यासाठी विशेष एसटी बस आणि रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आली असली तरी गेल्या काही दिवसांत कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमन्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाचे संकट असूनही सुरुवातीच्या काळात चाकरमनी मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना दिसत होते. आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोक बाहेरून कोकणात दाखल झाले होते. मात्र, १२ ऑगस्टनंतर कोकणात जाण्यासाठी कोरोना चाचणीची अट घालण्यात आल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गावर १९ ते २२ ऑगस्टच्या कालावधीत अवजड वाहनांना बंदी

१३ ते २१ ऑगस्ट म्हणजेच गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत एसटी सोडण्याचे नियोजन सरकारने केले आहे. याशिवाय, आजपासून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेसेवाही सुरु झाली आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत सुटणाऱ्या १६२ गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून एसटी सेवेला तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यासाठी सरकारकडून घालण्यात आलेली कोरोना चाचणीची अट कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.


एसटीने प्रवास करायचा झाल्यास ४८ तास आधी करोना चाचणी करायची. त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल तर प्रवास करायचा, अहवाल पॉझिटिव्ह असला तरी आरक्षणाचे पैसे परत मिळणार नाहीत, असा नियम घालून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशी आर्थिक भुर्दंड सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीत. परिणामी ३ ते २१ ऑगस्टपर्यंतसाठी आतापर्यंत फक्त ५ प्रवाशांनीच एसटीचे आरक्षण केल्याचे कळते. एसटीसोबतच खासगी बसकडेही चाकरमान्यांनी पाठ फिरवली आहे. १२ ऑगस्टपर्यंत या बसला चांगला प्रतिसाद होता मात्र १३ ऑगस्टपासून एकाही प्रवाशाने आरक्षण केले नाही, असे खासगी बसचालकांनी सांगितले.