कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेसोबतच्या जागावाटपाबाबत भाजपमध्येच संभ्रमावस्था असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आगामी विधासनसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये १३५-१३५ असा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत १३५-१३५ आणि मित्रपक्षांना १८ जागा असं सूत्र ठरल्याचं सांगितलं होतं. तर जागावाटपाबाबत अद्याप चर्चा किंवा बैठकच झालेली नाही, असं जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले होते. त्यामुळं भाजपमध्येच याबाबत संभ्रम आहे की, जाणीवपूर्वक असा संभ्रम निर्माण केला जातो, याची चर्चा रंगली आहे.


शिवसेना-भाजप युतीत १४४-१४४ की १३५-१३५ याबाबत संभ्रम आहे. यात मित्रपक्षांना भाजपाच्या चिन्हांवर लढवण्याचा आग्रह होत असल्याचा आक्षेप शिवसेनेनं घेत, याविरोधात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं, त्याचवेळी मित्रपक्षांना चिन्हाचा आग्रह करु असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं.


हा संभ्रम कमी की काय म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलेला जागावाटपाचा फॉर्म्युला योग्य नसून फॉर्म्युला ठरलाच नसल्याचा दावा आता सुधीर मुनगंटीवार करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे नेते मात्र सर्व आलबेल असल्याचं सांगत उघड संघर्ष टाळत आहेत. 


लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत समसमान जागावाटप आणि सत्तेत समान वाटा हे सूत्र ठरलंय. मात्र मुख्यमंत्रीपद कुणाकडे, याबाबत संभ्रम आहे. ज्या पक्षाला जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल, तर मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर लढवून मुख्यमंत्रीपद पदरात पाडण्याची भाजपची इच्छा दिसते आहे. त्यामुळेच तर हा संभ्रम नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.