वातावरण फिरलं, शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता
अवघ्या तासाभरापूर्वी जल्लोष करणाऱ्या शिवसेनेच्या गोटात सध्या चिडीचूप शांतता पसरली आहे.
मुंबई: राज्यात सरकार कधी स्थापन होणार, या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला सोमवारी चक्रावून टाकणाऱ्या राजकीय घटनाक्रमाला सामोरे जावे लागले. आज सकाळपासून सुरु असलेल्या चर्चेनंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन करणार, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाल्यावर यावर जणू शिक्कामोर्तबच झाल्याची भावना सर्वांमध्ये होती.
त्यामुळे राज्यभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली होती. प्रसारमाध्यमांवर शिवसेनेचा मुख्यमंत्री १७ तारखेला शपथ घेणार, अशा बातम्याही झळकायला लागल्या होत्या. मढ आयलंय येथील द रिट्रीट हॉटेलवर शिवसेना आमदारांनीही मोठ्या उत्साहात प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु, काहीवेळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राजभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांचे चेहर खर्रकन उतरले. अवघ्या तासाभरापूर्वी जल्लोष करणाऱ्या शिवसेनेच्या गोटात सध्या चिडीचूप शांतता पसरली आहे.
शिवसेनेला मोठा धक्का; सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार
दरम्यान, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी बदललेली भूमिका कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात असताना काँग्रेसकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. आम्हाला अजूनही शरद पवारांशी चर्चा करायचे असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते.
त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी शिवसेनेला तोंडघशी पाडले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे. आता हे दोन्ही पक्ष मिळून सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.