काँग्रेसमधील वाद : राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना दिली तंबी
मुंबई जिल्हा काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी तातडीने मिटवा, अशी तंबी राहुल गांधी यांनी दिली.
मुंबई : मुंबई जिल्हा काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी तातडीने मिटवा, अशी तंबी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलीय. आगामी लोकसभा निवडणुकीत हेवेदावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी एकोप्याने काम करावे, अशा सूचना त्यांनी संजय निरुपम आणि मिलिंद देवरा गटाला दिल्या आहेत. मुंबईतील जाहीर सभेसाठी आले असताना राहुल गांधी यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांला बाजूला बसवून त्यांच्याशी संवाद साधला.
माजी खासदार प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदूरकर, भालचंद्र मुणगेकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. राहुल गांधींशी झालेल्या भेटीनंतर प्रिया दत्त पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधी - प्रकाश आंबेडकर भेट ?
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आंबेडकरांच्या भेटीसाठी अनुकूल आहेत. दरम्यान, आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची लेखी हमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलीय.