महाविकास आघाडी सरकारबाबत काँग्रेसचं मोठं वक्तव्य, अशोक चव्हाण म्हणाले...
बंडखोर आमदारांना आवाहन करत मुंबईत या, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आपलं मत मांडलं आहे.
Eknath Shinde Rebel: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे आमदार एक एक करून शिंदेंच्या गटात सामील होत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी अल्पमतात आलं असून सरकारवर टांगती तलवार आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतात? याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्त्यव्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. बंडखोर आमदारांना आवाहन करत मुंबईत या, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आपलं मत मांडलं आहे.
"आजची जी राजकीय परिस्थिती त्यावर चर्चा सुरु आहे. 2019 साली महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी कॉमन मिनिमन प्रोग्राम अंतर्गत काँग्रेस सत्तेत सहभागी झाली होती. भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. आताही काँग्रेसचं महाविकास आघाडीला समर्थन आहे.", असं काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचाली
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे गटाचे 50 आमदार आणि भाजप यांची युती होऊन राज्यात नवे सत्तासमीकरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडूनही एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. तसेच 12 मंत्री होऊ शकतात, अशी शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक 50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळुन 164 आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करुन राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत.