`बालभारती`च्या पुस्तकातून सुखदेव यांचा उल्लेख वगळला, काँग्रेस म्हणते...
हुतात्मा कुर्बान हुसेन हेदेखील देशासाठी फासावर गेले होते. तेही भारताचे शहीद सुपूत्र आहेत.
मुंबई: बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील एका धड्यात क्रांतिकारक सुखदेव यांचा उल्लेख वगळल्याच्या मुद्द्यावरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भूमिका मांडली आहे. सावंत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, सदर आक्षेप हा अनाठायी आहे. फडणवीस सरकारच्या काळातील सदर पुस्तक इतिहासाचे नसून मराठी भाषेचे आहे. त्यातही सदर भाग हा स्व. यदुनाथ थत्ते यांच्या लेखाचा आहे. हुतात्मा कुर्बान हुसेन हेदेखील देशासाठी फासावर गेले होते. तेही भारताचे शहीद सुपूत्र आहेत. त्यांचाही आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
बालभारतीची अभ्यास समिती बरखास्त करा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- संभाजी ब्रिगेड
तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन संभाजी ब्रिगेड प्रचंड आक्रमक झाली आहे. ही चूक करणाऱ्या बालभारतीची अभ्यास समिती बरखास्त करावी. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
काय आहे वाद?
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करलं हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ या धड्यात सुखेदव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय म्हणतात?
मराठी विषयाच्या पुस्तकात नामांकित साहित्यिक, कवी यांचे लेख घेतले जातात. युदुनाथ थत्ते यांच्या माझ्या देशावर माझे प्रेम आहे या प्रकरणातून घेतलेला परिच्छेद आहे.त्यांच्या कुटुंबीयांच्या परवानगी शिवाय बदलता येत नाही. मागील सरकारच्या काळात २०१८ साली या प्रकरणाचा पाठ्यपुस्तकात समावेश झालेला आहे. हा अभ्यासक्रम 2018 साली बनवला आहे. प्रत्येक १० वर्षांनी अभ्यासक्रम बदलला जातो. केंद्राची नवी शैक्षणिक पॉलिसी येत आहे. त्यानंतर राज्य सरकार NCRTE च्या माध्यमातून अभ्यासक्रम बदलू शकेल.
बालभारतीचं स्पष्टीकरण
लेखक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातील लेख जसाच्या तसा आठवीच्या भाषेच्या पाठ्यपुस्तकात वापरण्यात आला आहे. त्यांच्या पुस्तकातील मुळ मांडणीच तशी आहे. आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा उल्लेख आहे. त्यांच्यासारखेच कुर्बान हुसेन हे सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सोलापूरमध्ये त्या काळी वृत्तपत्र सुरू केले होते. भाषेच्या पुस्तकातील या उल्लेखाच्या संदर्भातील अधिक तपशील, पुरावे मिळवण्यात येत आहेत.