बालभारतीची अभ्यास समिती बरखास्त करा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- संभाजी ब्रिगेड

राष्ट्रपुरुष असणाऱ्या व्यक्तींची किंवा महापुरुषांची सतत बालभारती जाणीवपूर्वक बदनामी करते 

Updated: Jul 17, 2020, 03:40 PM IST
बालभारतीची अभ्यास समिती बरखास्त करा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- संभाजी ब्रिगेड title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे:  'इन्कलाब जिंदाबाद...' म्हणत भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशासाठी स्वतःचे प्राण दिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. हा इतिहास असताना राज्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या वतीने बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात यदुनाथ थत्ते यांच्या पाठामध्ये सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले, असे लिहण्यात आले आहे. 

जणू काही राष्ट्रपुरूषाची दरवर्षी बदनामी करायची याची सुपारी बालभारतीने घेतलेली आहे असेच या चुकीवरून दिसते. शिक्षण मंत्र्यांनी डोळे उघडे ठेवून हे पुस्तक वाचावे आणि बालभारतीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून दोषी असणाऱ्या प्रत्येकांना तात्काळ अटक करावी. तसेच 'बालभारतीची अभ्यास समिती' तात्काळ बरखास्त करावी, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. कारण राष्ट्रपुरुष असणाऱ्या व्यक्तींची किंवा महापुरुषांची सतत बालभारती जाणीवपूर्वक बदनामी करते हा खोडसाळपणा चालणार नाही. संभाजी ब्रिगेड झालेल्या चुकीवर शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

शिक्षणमंत्री कुठल्याही पत्राला उत्तर देत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केल्यानंतर रिप्लाय मिळतो. मात्र, शिक्षण मंत्री रिप्लाय देत नाहीत ही सत्तेची गुर्मी आहे. कारण राज्यात कोरोना महामारीचे संकट असताना सर्व शाळा व महाविद्यालयांची ५० टक्के फी माफ करावी, याबाबत संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने सतत पत्रव्यवहार करत असताना त्यावर शिक्षण मंत्री व त्यांचे कार्यालय कोणत्याही प्रकारचा पत्राला उत्तर (रिप्लाय) मिळत नाही हे हे दुर्दैव आहे. 

आज पुस्तकांमध्ये झालेली चूक ही शिक्षणव्यवस्थेचा झालेला खेळखंडोबा आहे. याचा सर्वप्रथम जाहीर निषेध. जर तात्काळ शिक्षणमंत्र्यांनी बालभारतीच्या संचालक व्यवस्थापक व संबंधित लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल केला नाही तर संभाजी ब्रिगेड त्या अधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला.

काय आहे वाद? 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करलं हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ या धड्यात सुखेदव  यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. ब्राह्मण महासंघाने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान आहे. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.