मुंबई : गेल्या वर्षभरापासून देशातील प्रत्येकजण कोरोनाच्या कठीण परिस्थितीशी लढा देत आहेत. राज्यात दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर या दोन्ही लाटांचा यशस्वी सामना करणाऱ्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती सर्वोत्तम आहे. मुंबईत आता कोरोनाची परिस्थिती आटोक्याच आली आहे.  मुंबईत नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. तर मृत्यू दरही घटला आहे. त्यामुळे मुंबईत अनक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. मंगळवारी मुंबईत केवळ 198 रूग्ण आढळले तर 24 तासांत केवळ 2 रूग्णांचा मृत्यू झाला. मार्च 2021 नंतरचा हा निचांकी आकडा आहे. कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त होते.


20 हजार चाचण्यांमध्ये सुमारे 28 टक्के बाधित आढळत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येने 11 हजारांचा टप्पा गाठत एका दिवसात सर्वाधिक बाधितांची नोंद केली. तर आता सद्यस्थितीत रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. 


कोरोनाची परिस्थिती  नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 'ब्रेक दि चेन' अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आता नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. 


सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह आवश्यक सर्व निर्देशांचे पालन करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.