मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातले सर्वाधिक रुग्ण हे सध्या महाराष्ट्रात आहेत. एवढच नाही तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्यादेखील राज्यात सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे काका-पुतण्या यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो, पण यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. 'वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यकर्ते मला भेटायला येतात, पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. या वातावरणात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे कोणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नये. तुम्ही जिकडे असाल, तिथेच जनतेला मदत करा. याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील,' असं परिपत्रक राज ठाकरेंनी काढलं आहे. 



दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १३ जून रोजी आहे. आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. 'वाढदिवसानिमित्त जिकडे असाल तिकडूनच मला शुभेच्छा द्या. होर्डिंग्स, हार-तुरे, केक हा खर्च टाळून कोरोना संकटात अडकलेल्यांना मदत करा, किंवा हे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या,' असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.