दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाची संख्या रोखण्यासाठी आता राज्य सरकारने नवीन रणनिती आखली आहे. मुंबईत कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी आता मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या ज्या भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे, त्या भागातील स्थिती आटोक्यात आणण्यासाठी मंत्र्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्येनुसार मुंबईचे विभाग पाडण्यात येणार आहे. या प्रत्येक विभागाची जबाबदारी एका मंत्र्यावर सोपवण्यात येणार आहे. संबंधित विभागात अन्नधान्य देणं, रुग्णांची व्यवस्था करणं, क्वारंटाईन व्यवस्था, आरोग्य सुविधा यांचा समन्वय करण्याची जबाबदारी मंत्री पार पाडणार आहे. 


मुंबईची जबाबदारी दिली जाणाऱ्या मंत्र्यांमध्ये नवाब मलिक, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांचा समावेश असल्याची माहिती आहे. 


मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १६,७३८ एवढी झाली आहे, तर ६२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या एका दिवसात मुंबईत २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये कोरोनाचे एका दिवसात ३३ रुग्ण वाढले आहेत. धारावीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४९ एवढी झाली आहे. धारावीमध्ये आज ९ मृत्यूंची नोंद झाली असली तरी आजचे मृत्यू हे २ आहेत, तर उर्वरित ७ मृत्यू हे गेल्या २-३ दिवसातील आहेत. धारावीमध्ये कोरोनाचे एकूण १,०६१ रुग्ण आहेत. दादरमध्ये कोरोनाचे ६ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या १३९ एवढी झाली आहे. माहिममध्ये ७ नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १६२ झाली आहे.


राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय