मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईतही कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 52 रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईत कोरोनो रुग्णांची संख्या 330 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आल्याने ही मुंबईसाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आतापर्यंत धारावीमध्ये 4 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 



मुंबईत कोरोनाचे हॉटस्पॉट वाढत आहेत. मुंबईतील वरळी, मानखुर्द, वांद्रे , अंधेरी ही ठिकाणं हॉटस्पॉट ठरली आहेत. तर मुंबईत 191 कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. ज्या परिसरात कोरोना रुग्ण आढळून येतो, ती ठिकाणं, तो संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे. कोणालाही बाहेर पडू दिलं जात नाही. या काळात त्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा महापालिका करते. तसंच या भागाचं निर्जंतुकीकरण केलं जातं. ज्या घरात कोरोनाचा रुग्ण सापडलाय, त्या मजल्यावरच्या किंवा आजूबाजूच्या काही घरांतल्या लोकांना वेगळ्या ठिकाणी हलवून त्यांना क्वारंटाईन आणि त्यांची तपासणी केली जाते आहे. 


मुंबईतील अनेक रस्त्यांवर गल्ली-बोळांतून अनेक लोक बाहेर फिरतान दिसतात. प्रशासनाकडून सतत बाहेर न जाण्याचं, घरातच बसण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र अद्यापही लोकांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्याचंच चित्र आहे. सर्वांनी घरात बसून कोरोनाचा सामना करणं आवश्यक आहे. घरात बसणं हाच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकमेव उपाय आहे. 


राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या आकडा 537वर पोहचला आहे.