मुंबई कोरोनाच्या विळख्यात; आयसोलेशन छावण्यांची युद्धपातळीवर उभारणी
मुंबईत ठिकठिकाणी क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या छावण्या उभारणीसाठी युद्धपातळीवर काम सुरु झालं आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात प्लास्टिकमध्ये बांधलेल्या मृतदेहांच्या बाजूलाच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशभरात एकच खळबळ उडालीय. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या छावण्या उभारणीसाठी युद्धपातळीवर काम सुरु झालं आहे.
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेत. तसंच कोरानामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडादेखील मुंबईत सर्वाधिक आहे. गुरूवारी रात्रीपर्यंत मुंबईत ११ हजार ३९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर मृतांचा आकडा ४३७ पर्यंत पोहोचला आहे. कोरोनाचा मृत्यूदरही ३.८४ इतका आहे.
सायन रुग्णालयातल्या कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचा आणि तिथेच कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुंबईसह देशात भितीचं वातावरण तयार झालं. त्यात आर्थर रोड जेलमधील ७७ कैदी आणि २६ पोलीस कर्मचाऱ्यांना कौरानाची बाधा झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनीच दिली. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर झाल्याने लष्कराला पाचारण केलं जाणार किंवा मुंबई पूर्णपणे शटडाऊन केली जाणार अशा अफवा पसरल्या... शेवटी मुंबई पोलिसांना ट्विट करुन मुंबईतली परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करावं लागलं.
सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार; किरीट सोमय्यांची ICMRकडे तक्रार
पण पोलीस किंवा प्रशासनाने कितीही दावा केला तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाचं संकट अधिक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.
म्हणजे ३० मेपर्यंत मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळेच महापालिकेकडून मुंबईत गोरेगावच्या नॅशनल एक्झिबिशन सेंटर आणि वरळीच्या नॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सपाठोपाठ बिकेसी ग्राऊंड, नेहरु सायन्स सेंटर, भायखळ्याचं रिचर्डसन क्रुडास कंपाऊंड आणि महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंग स्लॉटमध्ये क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या छावण्या तयार केल्या जात आहेत.
एवढंच नाही तर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मुंबईतल्या केंद्रीय आस्थापनांमध्येसुद्धा कोरोना निवारण कक्ष उभारणीचा प्रस्ताव दिला आहे.
कोरोना मृतदेहाच्या व्हायरल व्हिडिओबाबत हॉस्पिटलचे हे स्पष्टीकरण