मुंबई: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांच्याकडून अखेर दादरमधील कोहिनूर स्क्वेअर प्रकल्पाचे काम काढून घेण्यात आले आहे. दादरमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोहिनूर ट्विन टॉवर बांधण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पैशांअभावी या प्रकल्पाचे बांधकाम बंद पडले होते. अखेर रिअल इस्टेटचा २००० कोटींचा हा प्रोजक्ट दादरच्या प्रभादेवी येथील संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट या कंपनीकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या १५ ते १८ महिन्यांत कोहिनूर ट्विन टॉवरचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहिनूर ट्विन टॉवरच्या बांधकामासाठी उन्मेश जोशी यांनी बँक आणि वित्तसंस्थांकडून जवळपास ९०० कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाचे हप्ते थकवल्याने संबंधित वित्तसंस्थेने राष्ट्रीय कंपनी लवादाकडे दाद मागितली होती. यावर झालेल्या सुनावणीवेळी लवादाने संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट यांच्याकडे हा प्रकल्प सोपवला.


कोहिनूर स्क्वेअरच्या ट्विन टॉवर पैकी एक टॉवर हा ५२ मजल्यांचा तर दुसरा ३५ मजल्यांचा बांधण्यात येणार आहे. यातील एक टॉवर फाइव्ह स्टार हॉटेल्स आणि व्यावसायिक वापरासाठी तर दुसरा टॉवर पूर्णपणे रहिवाशांसाठी बांधण्यात येणार आहे. २००९मध्ये या प्रोजेक्टचे काम सुरू झाले होते.