मुंबई: महाविकासआघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीत योजनेच्या अंमलबजावणीत मोठा घोळ झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्डाची करण्यात आलेली सक्तीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँकेतील आधार क्रमांक आणि प्रत्यक्षातला आधार क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या' गतीने कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील; फडणवीसांचा सरकारला टोला


महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ३५ लाख शेतकर्‍यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. अंमलबजावणीत कोणताही घोळ होऊ नये, यासाठी सरकारने टप्याटप्याने लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यासाठी मार्च ते एप्रिल हा तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, इतक्या कुर्मगतीने कर्जमाफीची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यास अनेक महिने वाट पाहावी लागले, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यामुळे दुसऱ्या यादीत तब्बल २२ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर


यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सगळ्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्यात विविध भागात झालेला अवकाळी पाऊस आणि कर्जमाफीच्या यादीतील घोळ यामुळे विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज झालेत.