शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

दुसऱ्या यादीत २२ लाख शेतकऱ्यांचा समावेश.

Updated: Feb 29, 2020, 07:31 PM IST
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली. या यादीत तब्बल २२ लाख शेतकर्‍यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ३५ लाख शेतकर्‍यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता दुसरी यादी २२ लाख शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सोमवारी यासंदर्भात अधिवेशनात माहिती देण्याची शक्यता आहे.

आज जाहीर झालेल्या यादीत राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १५ जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांची यादी जाहीर झाली आहे. तर ६ जिल्ह्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. तर उरलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची अंशतः यादी जाहीर झालेली आहे.

दरम्यान, ही यादी जाहीर झाल्यानंतर आज दिवसभरात ७३ हजार शेतकऱ्यांनी आपल्याला कर्जमाफी मान्य असल्याचे कळवले. त्यापैकी १४ हजार ३०० शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसेही वळते करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी इंटरनेट नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यात १५३३८ शेतकऱ्यांना एकूण ९७ कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली होती. यापैकी १३ हजार ७०० शेतकऱ्यांच्या खात्यात ६२ कोटी रुपये वळते करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीसाठी ३६.४५ लाख खाती निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी ३४.९८ लाख खाती पोर्टलवर अपलोड झाली आहेत. उर्वरित खात्यांची माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरु आहे. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.