Ajit Pawar | महाराष्ट्र मास्कमुक्त केव्हा होणार? अखेर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंच
महाराष्ट्र मास्कमुक्त केव्हा होणार, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
मुंबई : कोरोनाला (Corona) रोखण्यासाठी आपण सर्व गेल्या 2 वर्षांपासून लढा देत आहोत. कोरोना रोखण्यासाठी मास्क हेच प्रमुख शस्त्र आहे. राज्यात आता कोरोनाचा जोर बऱ्याच प्रमाणात ओसरला आहे. अनेक निर्बंध हे शिथिलही करण्यात आले आहेत. मुंबईही फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत अनलॉक (Mumbai Unlock) होण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता लवकरच राज्य मास्कमुक्त होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र मास्कमुक्त केव्हा होणार, या शक्यतेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टच सांगितलं आहे. (deputy chief minister ajit pawar give comment on maskfree state during to inspection of development works at mumbai with aditya thackeray)
अजित पवार काय म्हणाले?
"राज्य मास्कमुक्त अजिबात नाही. तशी चर्चाही नाही. उगीच अफवा पसरवू नका. जेव्हा मास्कमुक्त होण्याचा निर्णय घेऊ तेव्हा पत्रकार परिषद घेऊ", अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कमुक्तीच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी आज सकाळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबईतील विकास कामांची पाहणी केली. यावेळेस त्यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरेंचं कौतुक
या विकास कामाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. आदित्य ठाकरे यांच्या 'मिशन मुंबई'ला अजित पवार यांनी 650 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे मुंबईत विकासकामं वेगानं सुरु आहे.
या विकासकामांची दखल घेत अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचं कौतुकही केलं. तर दादर चैत्यभूमी येथील नवीन झालेल्या व्ह्युविंग डेकचीही पाहणी अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केली.