मुंबई : भाजप आणि शिवसेनेनं येणारी लोकसभा निवडणूक एकत्र लढायला हवी, याचा पुनरुच्चार करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे आता शरयू नदीत पडलेत, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला येत्या १५ वर्षांपर्यंत विरोधकांच्या बाकावर बसावं लागेल, याची सेनेला आठवण करून देण्यासही फडणवीस विसरले नाहीत.


नाणार रिफायनरी आणि समृद्धी कॉरिडोअर योजनेवर शिवसेनेनं साधलेल्या चुप्पीवर विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस) यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. 


शिवसेनेचे राजीनामे आता शरयू नदीत पडलेत. तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्ही दोघं (शिवसेना आणि भाजप) एकत्र आहोत आणि कोणत्याही राजीनाम्याची आता गरज नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 


जेव्हा आम्ही एकत्र आहोत तेव्हा सत्तेत परतण्याची कोणतीही संधी तुमच्याकडे नाही. तुम्हाला १०-१५ वर्षांसाटी विरोधी पक्षाच्याच बाकांवर बसावं लागणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळी दोन निशाणे साधलेत. 


शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गेल्या वर्षी, भाजप नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये शिवसेनेचे नेते आपल्या खिशांत राजीनामे घेऊन फिरत आहेत आणि केवळ पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट पाहत आहेत, असं म्हटलं होतं.