दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडले जाणार आहे. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Coronavirus: धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजाताईंचा फोन, म्हणाल्या...


गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून आज ते आपल्या घरी परततील. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे  महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. 


धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वीच बीडहून मुंबईत परतले होते. ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. यादरम्यान धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती.


दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात काल सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १,३२,०७५  इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे  ६,१७० मृत्यू झाले आहेत.