Coronavirus: धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजाताईंचा फोन, म्हणाल्या...

धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे कळताच आज पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली.

Updated: Jun 12, 2020, 10:34 PM IST
Coronavirus: धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजाताईंचा फोन, म्हणाल्या... title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र, एखाद्या दु:खाच्या किंवा अडचणीच्या प्रसंगी हे भाऊबहीण एकमेकांच्या मदतीला धावून गेले आहेत. याचाच प्रत्यय आता धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आला. धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे कळताच आज पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली. स्वत:ची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे. आई आणि लहान मुली आहेत. कोरोनातून लवकर बरा हो, असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुडेंना सांगितल्याचे समजते. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडेंसोबत कोणकोणते मंत्री होते उपस्थित?

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा आणि धनंजय मुंडे परळी मतदरासंघात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यावेळी प्रचाराची पातळी खालावल्याने दोघांमध्ये बरेच वितुष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी प्रथमच एकमेकाशी संवाद साधला आहे. 

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

आज सकाळीच धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. आठ ते दहा दिवसात कोरोनावर मात करतील, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे या सोमवारी बीडहून मुंबईत परतले होते. ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. यापैकी पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे आज रूग्णालयात दाखल होणार आहेत. मुंडे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरानाची लागण झाली आहे.  यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती, त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.