मुंबई: सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने सोमवारी पुन्हा एकदा फडणवीस सरकारला धारेवर धरले. सरकारने ओल्या दुष्काळाने केलेली शेतकऱ्यांची कोंडी आधी फोडावी. सरकार बनविण्याच्या पेचात शेतकऱ्यांना जगण्याचा पेच पडू देऊ नका, असा सल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या समसमान वाटपासाठी सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार तणातणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी उद्धव ठाकरे यांनी परतीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यानंतर 'सामना'तून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारी उपाययोजना कशा अपुऱ्या पडत आहेत, याचा पाढाच वाचण्यात आला आहे. 


'उद्धव ठाकरेंचं जवळपास ठरलंय; शिवसेनेला १७५ आमदारांचा पाठिंबा'


सरकारने दात कोरून मदत करावी तसे १० हजार कोटी अवकाळीग्रस्तांना जाहीर केले. किमान २५ ते ३० हजार कोटींची मदत हवी होती. सरकार काळजीवाहू असो किंवा आणखी कसे, अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला दर हेक्टरी किमा २५ हजार रुपये तातडीची मदत सरकारने द्यायला हवी. पंचनाम्याच्या भानगडीत न पडता शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत पोहोचायला हवी. पडेल ती किंमत मोजून शेतकऱ्यांना जगवायला हवे, अशी मागणी करत शिवसेनेने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 


'दोस्ती उन्ही से बनाओ जो निभाने की औकात रखते हो !'


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पंचनामे न झाल्यासही मदत मिळेल, असे सांगून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आम्ही केंद्राकडून अतिरिक्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, शिवसेनने यापूर्वी पीकविमा आणि कर्जमाफी योजनांचा कसा बोजवारा उडाला, हे सांगत फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.