मुंबई: शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी गुरुवारी पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. आज मुंबईतील शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव विधिमंडळ नेतेपदासाठी सुचवले. यानंतर पक्षातील इतर सदस्यांनी एकमताने आदित्य यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. तर विधानसभेतील शिवसेनेचे प्रतोद म्हणून दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विधिमंडळ गटनेतेपदासाठी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात स्पर्धा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांचा अनुभव पाहता पक्षनेतृत्वाकडून पुन्हा एकदा त्यांच्यावर विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'युतीचा तिढा सोडवायचा असेल तर एकाला त्याग करावा लागेल'


ठाण्यात शिवसेनेचे एकहाती वर्चस्व ठेवून असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील मास लीडर म्हणून ओळखले जातात. याशिवाय, संघटनेतील सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची हातोटी शिंदे यांच्याकडे आहे. तर दुसरीकडे आदित्य यंदा पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांना सभागृहातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. त्यांनी आतापर्यंत केवळ पक्ष संघटनेतील पदांवर काम केले आहे. त्यामुळे सभागृहात एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचा अनुभव तोकडा पडू शकतो. हाच विचार करून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील जुन्याजाणत्या नेत्याकडेच विधिमंडळ नेतेपदाची सूत्रे दिल्याची शक्यता आहे. विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.


शिवसेना नरमली ही केवळ अफवा- संजय राऊत



काही दिवसांपूर्वीच भाजपकडून विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली होती. यानंतर भाजपकडून लगेचच मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला होता. तर बुधवारी मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती.