मोठी बातमी! राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, अकरावी प्रवेशासाठीची CET रद्द
सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
मुंबई : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.
दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार होती. ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती तसंच 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती.