राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : लॉकडाऊनच्या काळातही वांद्रे स्टेशनवर हजारो मजूर एकत्र आल्यामुळे खळबळ उडाली होती. ट्रेन सुरू व्हायची अफवा पसरल्यामुळे हे मजूर स्टेशनवर आल्याचं बोललं जात आहे, पण मुंबई पोलिसांना ट्रेन सुरू व्हायच्या अफवेमुळे लोकं स्टेशनवर आली, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही लोकांची चौकशी करण्यात आली असली, तरी त्यांच्याकडे ट्रेन सुरू व्हायच्या अफवेबाबत कोणताही एसएमएस किंवा व्हॉट्सऍप मेसेज नाही, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या ट्रेन सीएसएमटी, दादर आणि एलटीटीवरून सुटतात, वांद्र्यावरून नाही. गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या ट्रेन वांद्रे टर्मिनसवरून निघतात, पण वांद्रे टर्मिनसही वांद्रे स्टेशनपासून १ ते २ किमी लांब आहे. वांद्रे स्टेशनवर जमलेल्या लोकांकडे कोणतंही सामान नव्हतं.


ट्रेन सुरू व्हायची अफवा असती तर मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून लोकं वांद्र्याला आली असती. पण मुंबईत सध्या प्रत्येक २ किलोमीटरवर पोलिसांचे चेक पोस्ट आहेत. एवढी सुरक्षा असताना वांद्रे स्टेशनवर पोहोचणं अशक्य आहे.


वांद्रे स्टेशनवर जमलेली गर्दी आसपासच्या झोपडपट्टीतील असल्याचं तिथल्या माजी नगरसेवक आणि सध्याच्या आमदारांनी मान्य केलं आहे. ट्रेन सुरू व्हायची जर अफवा पसरली नव्हती, मग ही लोकं एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकत्र कशी जमली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही वांद्र्याच्या शास्त्री नगर झोपडपट्टीत गेलो. या झोपडपट्टीतली माणसंही त्या गर्दीमध्ये होती. आम्हाला येत असलेल्या अडचणींमुळे आम्ही त्या गर्दीमध्ये गेल्याचं इथल्या लोकांनी मान्य केलं.


'मी बंगालमधून इकडे मजुरी करण्यासाठी आलो. कालच्या गर्दीमध्ये मीदेखील होतो. उद्या ४ वाजता मिटिंगला जायचं आहे, हे सगळ्यांनी आदल्या दिवशीच ठरवलं होतं. वस्तीमध्ये राहणाऱ्यांनी एकमेकांना हा मेसेज दिला होता. आमचा कोणताही नेता नाही. सगळ्यांनी स्वत:च भेटण्याचं ठरवलं होतं. ट्रेन सुरू होण्याची अफवा नव्हती आणि कोणतंही षडयंत्रही नव्हतं. आपण जेव्हा एकत्र येऊ तेव्हा मोठी माणसं, तुमच्यासारखी मीडियाची लोकं, पोलीस येतील आणि आम्हाला आमची समस्या मांडता येईल.'


'कोणाला जेवणाची समस्या आहे, तर कोणाला गावाला जायचं आहे. या भागात लहान लहान घरं आहेत. या घरांमध्ये १०-१०, १५-१५ लोकं एकत्र राहतात. आम्हाला पोटभर जेवण मिळत नाही. एका माणसाला फक्त एक पॅकेट मिळतं, दुसरं दिलं जात नाही. जेवणही खूप साधं असतं. जेवणामध्येही फक्त शाकाहारीच मिळतं. उकडलेले बटाटे खायला दिले जातात. मसालेदार जेवण मिळत नाही. या अडचणींमुळे हैराण होऊन आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं,' असं या मजुराने सांगितलं.


या मजुरासारखीच इथल्या आणखी दोन-तीन जणांनीही हीच कहाणी ऐकवली. या मजुरांनी सांगितलेलं खरं असेल तर, एक दिवस आधी वांद्रे स्टेशनवर जमायची योजना आखली जात होती, याचा सुगावा यंत्रणांना कसा लागला नाही? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्तचर यंत्रणांची भूमिका आणि त्यांच्या अपयशाची चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.


वांद्रे स्टेशनवरच्या गर्दी प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केले आहेत. यातला पहिला एफआयआर ८०० ते १ हजार लोकांवर गर्दीमध्ये सामील व्हायचा आणि लॉकडाऊनचा नियम मोडण्याचा आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. तर दुसरा एफआयआर विनय दुबेवर दाखल करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी विनय दुबेलाही अटक करण्यात आली आहे.