नाना पाटोले यांचा भाजपला घरचा आहेर
भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केलेय. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. राज्यात बोगस शेतकरी असल्याचे म्हटल्याने नाना पाटोले जाम संतापलेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे बोगस शेतकरी म्हणणे योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिलाय.
मुंबई : भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केलेय. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. राज्यात बोगस शेतकरी असल्याचे म्हटल्याने नाना पाटोले जाम संतापलेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे बोगस शेतकरी म्हणणे योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिलाय.
राज्यात १० लाख शेतकरी बोगस असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी कुठल्या आधारावर सांगितले, असा सवाल करताना, मी शेतातला माणूस असल्याने शेतकऱ्यांबद्दल कुणीही चुकीचे बोलल्यास मला चीड येते. मग ते भाजपचे मंत्री किंवा मित्र असले म्हणून काय झाले, अशा शब्दांत खासदार नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर दिला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, विदर्भातील आदिवासी आणि गोवारींचे प्रश्न, ओबीसीतील उमेदवारांना नोकरीत आरक्षण अशा विविध प्रश्नांवर नाना पटोले यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी आपली भूमिका मांडत भाजप सरकारवरही निशाणा साधला.
मुख्यमंत्री आणि माझी राजकीय कारकीर्द १९९९ पासून एकाचवेळी सुरू झाली. आमची दोघांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे माझा मित्र चुकला तर मित्राच्या हक्काने मी त्याला बोलणार, असे पटोले म्हणाले.