मुंबई : प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाच्या अदलाबदल प्रकरणी त्यांनी आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून अपशब्दांचा वापर केला गेला होता. त्याचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी याबाबत 'झी २४ तास'शी  बोलताना सांगितलं की, 'या सरकराच्या उणीवा समोर आणल्यानंतर मुस्काटदाबी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यभर फिरत असताना आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा, त्रुटी दाखवतोय, वाढीव बिलांमुळे जनता त्रस्त आहे, असे विषय घेऊन मी लढत आहे. त्याचाच भाग म्हणून सायनला मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर सायन रुग्णालयाच्या दुरावस्थेसंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची गर्दी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाली आहे. परंतु केवळ दबाबतंत्र बनून, मुस्काटदाबी म्हणून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.'


'आम्हाला जनतेच्या हितासाठी आंदोलन करत असताना गुन्ह्याची पर्वा नाही. आमची जबाबदारी जनतेला न्याय देण्याची आहे. त्यामुळे रोज अशाप्रकारचे गुन्हे दाखल केले, तरी आंदोनल करत राहणार, हीच आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका राहील,' अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली.


दरम्यान, सायन रुग्णालयासमोर आंदोलन करत असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला. सकाळपासून एकही अधिकारी भेटायला न आल्यामुळे त्यांच्या संतापाचा पारा चढला होता. त्यातच एक अधिकारी आल्यानंतर त्याच्याशी झालेल्या वादावादीत दरेकरांच्या तोंडून अपशब्द निघाला. मात्र ती आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, अशी सारवासारव नंतर त्यांनी केली. 


भाजप नेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला, त्यानंतर केली सारवासारव