भाजप नेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला, त्यानंतर केली सारवासारव

सायन रुग्णालयासमोर आंदोलन करत असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला.  

Updated: Sep 16, 2020, 12:54 PM IST
भाजप नेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला, त्यानंतर केली सारवासारव

मुंबई : सायन रुग्णालयासमोर आंदोलन करत असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला. सकाळपासून एकही अधिकारी भेटायला न आल्यामुळे त्यांच्या संतापाचा पारा चढला होता. त्यातच एक अधिकारी आल्यानंतर त्याच्याशी झालेल्या वादावादीत दरेकरांच्या तोंडून शिवी निघाली. मात्र ती आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, अशी सारवासारव नंतर त्यांनी केली. 

दरम्यान, सायन रुग्णालयाबाहेर सुरू केलेले आंदोलन भाजपने मागे घेतले. मृतदेह आदलाबदली आणि किडनी काढल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर त्यावर कारवाईची मागणी करत भाजपने हे आंदोलन सुरू केले होते. आज संध्याकाळी ५ वाजता याबाबत चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 

सायन रुग्णालयातील मृतदेह आदलाबदली प्रकरणी आणि किडनी काढल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने कारवाईची मागणी करण्या करता भाजपतर्फे आमदार कॅप्टन तमिल सेलवन, आमदार मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सकाळपासून धरणे आंदोलन केले होते. मात्र कोणीही महापालिका वरिष्ठ अधिकारी भेटायला न आल्यामुळे दरेकर यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. जोवर महापालिकेचे आयुक्त याठिकाणी भेटायला येणार नाहीत, तोवर हा रस्ता रोको सुरू राहणार आहे, असे प्रविण दरेकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, त्यांच्या आंदोलनानंतर अधिकारी फिरकले नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.