मुंबई : गेल्या दीड वर्षापासून आराध्याचे वडील दिवसरात्र एक करून तिच्यासाठी डोनर शोधत होते. अखेर तिला हृदयदाता मिळाला. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी संध्याकाळी योगेश मुळेंचा म्हणजे आराध्यच्या वडिलांचा फोन खणखणला, आराध्यासाठी एक चांगली बातमी घेऊन. फोन कॉल होता, आराध्यासाठी हृदयदाता मिळाल्याचा. फोन करणाऱ्याने सांगितलं, “आराध्याला हवं असलेलं हृदय सूरतच्या एका रुग्णालयात मिळालं आहे.”


हे ऐकताचं योगेश मुळेंचा आनंद गगनात मावेनासा झाला. सूरतवरून हृदय मुंबई आणण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला. सकाळी नऊ वाजता आराध्यावर मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाली. सूरतच्या एका ब्रेनडेड झालेल्या १४ महिन्यांच्या बाळाच्या अवयवदानानंतर आराध्याला हृदय मिळालं. या बाळाला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अवयवदानाबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली. कुटुंबियांनी परवानगी दिल्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.


माय मेडिकल मंत्राने दिलेल्या माहितीनुसार योगेश मुळेंच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसत होते. योगेश मुळे म्हणतात, “आराध्याला हृदयाचा आजार असल्याने डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण हाच शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलं होतं. गेले दीड वर्ष आम्ही सतत हृदयाच्या शोधात होतो. पण, अखेर बुधवारी तो फोन आला ज्याची मी गेले दीड वर्ष वाट पाहत होतो.”


गुजरातच्या डोनेट लाईफ या सामाजिक संघटनेचे कोऑर्डिनेटर निरव मंडेलवाला म्हणतात, “आम्ही सुद्धा गेले दीड वर्ष आराध्यासाठी हृदयाच्या शोधात होतो. खूप काळ प्रतिक्षेत राहिल्यानंतर आम्हाला १४ महिन्यांच्या बाळाचं हृदय मिळालं. हे बाळं ब्रेनडेड झालं होतं. या बाळाच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्यास परवानगी दिली, त्यानंतर अवयवदानाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली.”