प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईतली वाहतूक कोंडी आणि चिंचोळ्या रस्त्यांमुळे आगीच्य़ा वेळी फायरफायटिंग करताना अडचणी येतात. फायर ब्रिगेडचे बंब वेळेवर पोहचत नसल्यानं मुंबईकरांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची हानी होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुर्ला पश्चिमेतल्या मेहताब इमारत इमारतीचा आता फक्त राखेचा ढिगारा उरलाय. शुक्रवारी लागलेल्या आगीत इमारत जळून खाक झाली. ही इमारत आगीतून वाचवता आली असती. पण मुंबईतल्या वाहतूक कोंडीनं या इमारतीचा बळी घेतलाय. मुंबईतल्या वाहतूक कोंडीमुळे इमारतीतली २८ कुटुंब बेघर झाली आहेत. 



आगीची माहिती फायरब्रिगेडला वेळेवरच मिळाली होती. पण घटनास्थळी येण्यासाठी फायरब्रिगेडच्या बंबांना मोठा वळसा मारावा लागला. तर काही गाड्या कुर्ला ब्रिजखाली अडकल्या. जर गाड्या वेळेवर पोहचल्या असत्या तर इमारत वाचवता आली असती अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक
कप्तान मलिक यांनी दिली आहे.


मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी असते. तर अनेक झोपडपट्ट्यांमध्ये चिंचोळे रस्ते आहेत. त्यामुळं फायरब्रिगेडच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचता येत नाही. जर मुंबईतले रस्ते मोकळे झाले नाही. तर आगीतून मालमत्ता वाचवणं कर्मकठीण होऊन बसेल.