Coronavirus: धारावीत रुग्णालयातून घरी सोडलेल्या पाच जणांचा मृत्यू
दोन रुग्णांच्या कुटुंबीयांनी खासगी डॉक्टर्सकडून मृत्यूचे दाखले मिळवले होते.
मुंबई: शहरातील कोरोना (Coronavirus) रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारी मुंबईतील आरोग्य यंत्रणा एका नव्या घटनेमुळे धास्तावली आहे. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या धारावीतील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना साधारण महिनाभरापूर्वी COVID-19 टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. या सर्वांना १४ दिवस रुग्णालयात राहून व्यवस्थित उपचार घेतले होते. मात्र, आता या पाचही कोरोनामुक्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सुरुवातीला शुक्रवारी एकाच दिवशी या पाचही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पालिकेने हे सर्व मृत्यू एकाच दिवशी झाले नसल्याचा खुलासा केला आहे. या सगळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळालेली नसून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्याबाबत सांगता येईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.
राज्यात कोरोनाचे १०८९ रुग्ण वाढले, ३७ जणांचा मृत्यू
यापैकी दोन रुग्णांच्या कुटुंबीयांनी खासगी डॉक्टर्सकडून मृत्यूचे दाखले मिळवले होते. यामध्ये मृत्यूचे कारण कोरोना असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता आम्हाला रुग्णालयातून घरी सोडलेल्या रुग्णांच्याही संपर्कात राहावे लागणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्रातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
यापूर्वी दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा COVID-19 विषाणूचा संसर्ग झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे धारावीतही असाच प्रकार घडत तर नाही ना, अशी भीती आरोग्य यंत्रणेला सतावत आहे. धारावीत शुक्रवारी कोरोनाचे आणखी २५ नवे रुग्ण सापडले आहेत. माटुंगा लेबर कॅम्प, कुंचीकोरवे नगर, राजीव गांधी नगर, फातिमा चाळ, केएम चाळ, मदीना कंपाऊंड, मुस्लिम नगर आणि न्यू म्युनिसिपल चाळीत हे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ८०८ वर जाऊन पोहोचला आहे.