मुंबई : शुक्रवारी सकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. पावसाने उसंत घेतलेली नाही. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. पहिल्याच पावसाने तीन जणांचे बळी घेतले. तर मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. तसेच मुंबईची लाईफलाईन रेल्वे सेवाही कोलमडली होती. आजही मध्य रेल्वेची सेवा सकाळपासून विस्कळीत आहे. गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसाची रिमझिम सुरुच आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुसळधार पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मुंबई, रायगड आणि पालघर, पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मान्सूनला चांगली सुरुवात झाली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरताच राज्याच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय झाला.  मुंबईत रात्रभर अधूनमधून मुसळधार पाऊस पडत होता.  मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता. तसेच मुंबई आणि उपनगरातही रात्रभर पाऊस कोसळत होता. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागात विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. 



पुण्यात पावसाचे १७ बळी गेले आहेत. रात्री भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहर व परिसरात संततधार सुरू होती.