Gunratna Sadavarte : आणखी एक झटका, मुंबई, साताऱ्यानंतर पुढचा मुक्काम कोल्हापूर
सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच, आणखी एका ठिकाणी गुन्हा दाखल
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज मुंबईच्या गिरगाव न्यायालयानं न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची सदावर्ते यांनी कबुली दिल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला आहे.
दरम्यान, कोल्हापूर पोलीसांनी (Kolhapur Police) त्वरित सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना दिला आहे. कोल्हापूर पोलीस आर्थर रोडमधून सदावर्तेंचा ताबा घेतील. तिथे सदावर्ते यांना न्यायालयात हजर केलं जाणार असून कोल्हापूर पोलीस त्यांच्या कोठडी मागण्याची शक्यता आहे.
सातारा 2020 मधील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरुच
सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे.
सदावर्ते यांच्या पत्नी अॅड जयश्री पाटील यांच्याविरोधातही अकोट शहर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकर यांनी ८ जानेवारी २०२२ ला अकोट पोलीस स्थानकात तक्रार दिल होती. एसटी आंदोलनात कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.