मोठी बातमी । गृहमंत्री वळसे-पाटील यांची उचलबांगडी?, पवारांनी तातडीने घेतले बोलावून
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना बोलवून घेतल्याची माहिती आहे.
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना बोलवून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांची उलचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काल 'सिल्व्हर ओक' हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राज्य सरकारची आणि पोलिसांची नाचक्की झाली. त्यानंतर गृहखाते संभाळणाऱ्या वळसे-पाटील यांचे अपयश असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारने बुळबुळीत भूमिका घेणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवार यांनी तातडीने गृहमंत्री वळसे-पाटील यांना बोलावून घेतल्याने त्यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनावर कारवाई करत असताना राज्यातील तपास यंत्रणा मात्र शिथिल होत्या. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हद्वारे आरोप केल्यानंतर त्याची चौकशी करण्याती ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली होती. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरण बाहेर काढले असताना देवेंद्र फडणवीस यांची फक्त चौकशी करण्यात आली. मात्र, न्यायालयीन प्रकरण असल्याने कोणत्याही नेत्यांवर थेट कारवाई होऊ शकलेली नाही. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हे वादळ शमले. त्यानंतर काल त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस खात्याचे अपयश असल्याचे म्हटले.
दरम्यान, विरोधी पक्ष हल्ल्याचे समर्थन करतंय हा दळभद्रीपणा आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. सदावर्तेंना भाजपचं पाठबळ आहे. कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता असं राऊत यांनी म्हटलंय. सरकारने संयमाचा कडेलोट केल्याचा परिणाम म्हणजे कालचा हल्ला असं राऊत म्हणाले.संजय राऊत सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.
त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने दिलीप वळसे-पाटील यांना बोलावून घेतले. कालच्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी गृहमंत्र्यांकडे मागितली असल्याची माहिती आहे. यात पोलीस खात्याचे अपयश असल्याची खातरजमा झाली तर पवार त्यांचा राजीनामा घेतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.