मुंबई : महाविकासआघाडीच्या राज्यमंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना गृहनिर्माण मंत्री पद मिळाले आहे. संपूर्ण बालपण हे मुंबईच्या दहा बाय दहाच्या खोलीत घालवलेल्या, एका चाळीत वाढलेल्या व्यक्तीकडे गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताडदेव येथील श्रीपत भवन या चाळीतील खोली क्रमांक 6 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच बालपण गेलं. त्यानंतर खडतर प्रवास करून राजकारणात सक्रीय झालेल्या जितेंद्र आव्हाडांकडे आज राज्याच्या गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचं संपूर्ण श्रेय जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देतात. 



विद्यार्थी नेता म्हणून जितेंद्र आव्हाड पद्मसिंह पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या संपर्कात आले. यानंतरच आव्हाडांची खरी राजकीय कारकिर्द सुरू झाली. युवा नेता ते विद्यार्थी नेता आणि आता महाराष्ट्राचे राज्यमंत्री असा आव्हाडांचा प्रवास नक्कीच तरूणाईला प्रोत्साहन देणारा आहे. 


आई वडिलांनंतर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना सर्वस्व मानतात. अनेकदा त्यांनी पवारांमुळेच एका गिरणी कामगाराच्या कुटुंबातील तरूणाला संधी मिळाल्याचं कबुल केलं आहे. आताही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये शरद पवारांचे आभार मानले आहे. खोली क्रमांक 6, श्रीपात भवन, ताडदेव, मुंबई असा लहानपणीचा पत्ता टाकला आहे. आणि हा चाळीतील मुलगा राज्याच्या गृहनिर्माण मंत्री झाला हे सर्वस्व केवळ शरद पवारांच्यामुळे शक्य आहे अशी कृतज्ञता आव्हाडांनी व्यक्त केली आहे.