मुंबई : दहावी आणि बारावीच्या निकालाविषयीची ही सर्वात महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या, दहावी आणि बारावीच्या निकालाचे सध्या विद्यार्थ्यांना वेध लागलेले आहेत. मात्र खोट्या तारखा व्हॉटस अॅपवर फिरत आहेत. मात्र या तारखांवर विश्वास ठेवू नका, कारण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र यंदा निकाल वेळेवरच लागणार आहे, असं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना म्हटलं आहे. 


दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर लागणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर लागणार आहे, याची कोणतीही तारीख अजून निश्चित नाही. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, निकालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र अजूनही कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. 


विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा


मात्र जर मे महिन्यात निकाल जाहीर करणे शक्य झालं नाही, तर १० जूनपर्यंत बारावी तसेच दहावीचा निकाल नक्कीच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, असं अध्यक्षांनी म्हटलं आहे, तसेच व्हॉटसअॅपवरील तारखांवर विश्वास न ठेवता, विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा, असंही बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी म्हटलं आहे.


बारावीच्या निकालाविषयी शक्यता


तर यंदाच्या बारावी (एचएससी) परीक्षेचा निकाल ३० किंवा ३१ मे पर्यंत रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर हे वृत्त दिलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या शेवटी निकाल लागण्याची शक्यता आहे, असं टॉयने म्हटलं आहे. mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org या वेबसाईटवर हा निकाल जाहीर होणार आहे.