वाऱ्याचा अंदाज घेऊनच भाजपला साथ देईन- आठवले
आपल्या भाषणात नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.
मुंबई: आगामी निवडणुकीच्यावेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन भाजपला साथ द्यायची की नाही, हे ठरवेन, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात आमदार नसीम खान यांनी रामदास आठवलेंसमोर काँग्रेससोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्यांनी म्हटले की, मी १०-१५ वर्षे काँग्रेससोबत होतो. त्यामुळे मला भाजपसोबतदेखील १५-२० वर्षे राहावेच लागणार.
जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत मी भाजपसोबतच आहे. मी हवा पाहून अंदाज ठरवत असतो. त्यामुळे मी हवा कोणत्या दिशेने जातेय, याचा अंदाज घेऊनच पुढील निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर माझ्या रूपाने रिपाईला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. अर्थात मंत्री आहे म्हणून मला जनतेचा पाठिंबा आहे, असे नव्हे. मंत्रीपदावर नसलो तरी खेड्यापाड्यातील जनतेचा मला पाठिंबा असल्याचे यावेळी आठवलेंनी सांगितले.