उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रचा नंबर नाही पहिला
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1 असल्याचा गाजावाजा सरकारकडून नेहमी केला जातो... पण इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र चक्क सातव्या क्रमांकावर आहे... महाराष्ट्र सरकारच्या दाव्याची पोलखोल करणारा हा खास रिपोर्ट...
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1 असल्याचा गाजावाजा सरकारकडून नेहमी केला जातो... पण इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र चक्क सातव्या क्रमांकावर आहे... महाराष्ट्र सरकारच्या दाव्याची पोलखोल करणारा हा खास रिपोर्ट...
उद्योग क्षेत्रात नंबर वन असलेल्या महाराष्ट्रात खरंच उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं जाहीर केलेली ताजी आकडेवारी... इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र चक्क सातव्या स्थानावर असल्याची धक्कादायक माहिती या आकडेवारीतून पुढं आलीय... या क्रमवारीत तेलंगणानं अव्वल क्रमांक पटकावला असून, छत्तीसगड, ओरिसा आणि आसाम यांनी देखील महाराष्ट्रापेक्षा वरचं स्थान मिळवलंय...
या यादीत पहिल्या स्थानावर
तेलंगना - 54.03 टक्के गुणांसह
दुसऱ्या स्थानावर हरियाणा - 54.42 टक्के गुण
तिसऱ्या स्थानावर पश्चिम बंगाल - 41.40 टक्के गुण
चौथ्या स्थानावर छत्तीसगड - 38.17 टक्के गुण
पाचव्या स्थानावर ओरीसा - 36.29 टक्के गुण
सहाव्या स्थानावर आसाम - 35.48 टक्के गुण
तर महाराष्ट्र - 35.22 टक्के गुणांद्वारे महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे.
राज्यात उद्योग वाढीसाठी अनेक पावलं उचलल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार केला जातो.
राज्यात उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण आहे.
उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या अगदी सुलभ झाल्यात.
परवानग्यांसाठी वन विंडो सिस्टीम कार्यान्वित करण्यात आलीय.
असे अनेक दावे सरकारकडून वारंवार केले जातात. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं केंद्र सरकारच्या इंडस्ट्रीयल प्लॅनिंग अण्ड प्रमोशन विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झालंय.
विभागाच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात उद्योगांना परवानगी देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरूच झालेली नाही.
इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये प्रत्येक राज्याची प्रगती मोजण्यासाठी त्या राज्यानं काय सुधारणा केल्या त्याची तपासणी केली जाते.
महाराष्ट्रानं या क्षेत्रात आतापर्यंत 131 सुधारणा केल्या, पण 241 सुधारणा अद्याप बाकी आहेत.
विशेष म्हणजे छत्तीसगड, ओरिसा, आसाम यासारख्या मागासलेल्या राज्यांनी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यापेक्षा चांगली कामगिरी केल्याचं समोर आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्याचा क्रमांक तर महाराष्ट्रापेक्षाही मागे म्हणजे नवव्या स्थानावर आहे.
विशेष म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या क्रमवारीत जी पहिली तीन राज्य अग्रस्थानी आहेत, त्यापैकी तेलंगना आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्यं भाजपची सत्ता नसलेली आहेत... पण असं असतानाही महाराष्ट्र आणि गुजरातपेक्षा प्रभावी कामगिरी करण्याची किमया त्यांनी साधलीय... महाराष्ट्रातील भाजप सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असताना, समोर आलेली ही आकडेवारी निश्चितच डोळ्यात अंजन घालणारी आहे...