कमला मिल आग दुर्घटना : आणखी एकाला अटक
कमला मिल आग प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : कमला मिल कम्पाऊंड आग दुर्घटना प्रकरणात क्रिकेट बुकींचे लागेबांधे उघड झाल्यानं खळबळ माजलीय. आग प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. विशाल करिया असे त्याचे नाव आहे.
मुंबई पोलिसांनी एका बुकीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. नितेश राणे यांनीही काही धक्कादायक खुलासे करीत याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी लावून धरलीय.
ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी विशाल कारिया नावाच्या एका व्यक्तीला कमला मिल कम्पाऊंड आग दुर्घटना प्रकरणात चौकशीसाठी मंगळवारी पहाटे ताब्यात घेतलंय.
कारियाच्या घराबाहेर पोलिसांना फरार पब्स मालकांच्या गाड्या सापडल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केलाय. कारिया हा संशयांस्पद असून तो मोठा क्रिकेट बुकी असल्याची माहिती राणे यांनी दिली.
मुंबई पोलिसांनी नुकतीच जोजो आणि डिके या मोठ्या क्रिकेट बुकींवर केली होती. त्यांच्या मोबाईल सीडीआरमध्ये असलेला कारियाच्या संपर्कचा पुरावा राणे यांनी सादर केलाय. तसेच कारियाची पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असलेली ओळख लक्षात घेता तो याप्रकरणातून सुटेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आगीच्या दुर्घटनेची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीवर आपण ठाम असल्याचं राणे म्हणाले.
विशाल कारियाचा क्रिकेटमधला सहज वावर आणि अनेक स्टार क्रिकेटपतूंशी असलेली त्याची सलगी थक्क करायला लावणारी आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती आहे. तो क्रिकेटपटूंच्या ऐषोआरामची खास काळजी घेतो असं सांगितलं जातं.
मुंबई आणि दुबईमध्ये अनेक हुक्का पार्लर तसेच जोइन्ट्समध्ये त्याची पडद्यामागची पार्टनरशिप असल्याची चर्चा आहे. तसेच कारियाप्रमाणेच आणखी काही नामचीन बुकींनीही कमला मिलमधील रेस्टोपब्स आणि हुक्का पार्लर्समध्ये आपला बेहिशोबी पैसा गुंतवलाय. ही माहिती आग दुर्घटनेच्या प्रकरणामुळे प्रकर्षाने समोर येतेय.
उच्चभ्रूंचा मृत्यू आणि भ्रष्टाचाराची खोलवर गेलेली पाळंमुळं यामुळे आगीच्या दुर्घटनेचे हे प्रकरण हाय प्रोफाईल झालंय. रोज होत असलेल्या कारवाईवर सर्वांचीच नजर आहे. पण कारवाई टाळण्यासाठी राजकीय नेत्यांनी फोन करून दबाव आणल्याचा गौप्यस्फोटही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केलाय. त्यामुळे ती माहितीही बाहेर येण्यासाठी राणे यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय.
टीप : वरील सगळे फोटो नितेश राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये दिले आहेत.