मुंबई : देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3.0 सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी बाकी आहे. मात्र, लॉकडाऊन असूनही गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचंच चित्र आहे. देशातील रेड झोनअंतर्गत असलेल्या काही भागांत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येण्याची संभाव्य शक्यता वर्तवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 8 मेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांवर गेला आहे. 


मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. मुंबई, पुण्यात रेड झोनची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यांतील नेत्यांची सर्वपक्षीय बैठक बोलावून कोरोनाचा सामना करण्याविषयीच्या रणनीतीवर चर्चा केली. कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येबाबत राज्यातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.


मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना, वाढीव लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी, आम्ही या टप्प्यावर वाढीव लॉकडाऊनची शक्यता नाकारु शकत नाही. परंतु सध्या सुरु असलेलं लॉकडाऊन संपायला अजून 10 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे याबाबत आता प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचं ते म्हणाले.


मे महिन्याच्या शेवटपर्यंत अधिक सतर्क राहावे लागणार असून सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रसार होण्यावर नियंत्रण मिळवता आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्याला ग्रीन झोन बनविण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं असल्याचं सांगितलं, महाराष्ट्रातील काही हॉटस्पॉट, रेड झोनमध्ये, विशेषत: मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.