Mahrashtra Budget Session 2022 : मनी लॉन्ड्रींगप्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणाबाजी केली. तसंच पायऱ्यांच्या शेजारी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी फलक लावून सह्यांची मोहिम राबवली. या फलकावर सर्व भाजप आमदारांनी सही केली. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधीमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. 


नरहरी झिरवळ यांनी केली सही
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी लावलेल्या फलकावर भाजप आमदार सह करत असतानाच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांना विधानभवनात प्रवेश केला. विधानभवनात जाण्यासाठी गडबडीत असलेले झिरवळ पायऱ्यांजवळ पोहचात भाजपच्या काही आमदारांनी नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांना फलकावर सही करण्याची विनंती केली. 


फलक कसला आहे, त्यावर काय लिहिलं हे न पाहताच झिरवळ यांनीही विरोधकांच्या विनंतीला मान देत फलकावर सही केली. झिरवळ यांनी सही केल्यावर खूष झालेल्या विरोधकांच्या घोषणाबाजीला आणखीच जोर चढला. सध्या या सहीची राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.


विरोधकांच्या स्वाक्षरी मोहिमेची कल्पना नसलेल्या झिरवाळांनी सही केली; आणि काही क्षणातच चूक कळताच कपाळावर हात मारून घेण्याची वेळी त्यांच्यावर आली. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने विरोधकांच्या मागणीला जोर येऊन घोषणाबाजी रंगली.