मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. महाशिवआघाडीचे नेते सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री पद आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये काडीमोड झालाय. शिवसेना एनडीएतून बाहेर पडून वेगळा संसार मांडण्याच्या तयारीत आहे. तरीही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांना टोलवाटोलवी काही कमी झाली नाही. दादरच्या भाजप कार्यालयात भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करतानाच शिवसेनेवरही दोषारोप केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी गेले. या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप वगळता राज्यात कोणतंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्ष निर्णय घेईल, असंही ते म्हणाले.



आमदार कुठेही पाठवले नाही


नेतृत्वावर विश्वास असलेला भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे. आम्हाला आमदार कुठेही पाठवायची वेळ आली नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला नाव न घेता लगावला.